'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

Updated: Mar 8, 2020, 05:36 PM IST
'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार title=
फाईल फोटो

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गणेश नाईक हे खंडणीखोर आहेत, नवी मुंबईचे डॉन आहेत, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या आरोपाला गणेश नाईकांनी डायलॉगमधून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ये तेरे बस की बात नही.. तेरे बाप को बोल...असा टोला गणेश नाईकांनी लगावलाय. 

गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते शनिवारी कोपरखैरणे येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर टीकेची झोड उठवली. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, नवी मुंबईतील इमारती, कारखाने, दगडखाणी आणि इतर कंत्राटे कोणाकडे आहेत? खंडणी आणि धमकीच्याबाबतीत नवी मुंबईत गणेश नाईक यांचाच शब्द चालतो. नाईकांची ही सल्तनत नेस्तनाबूत करा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. 

येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत जोरदार तयारी सुरु आहे. नवी मुंबईतील नाईकांचे संस्थान खालसा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जातीने याठिकाणी लक्ष घालत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईत नाईक कुटुंबीयांचा दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे मिळाली होती. मात्र, वाऱ्याची दिशा ओळखून गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत नाईक घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.