'घाऊक' भरती; पिचड, नाईक, कोळंबकर, शिवेंद्रराजे, चित्रा वाघ यांचा भाजपात प्रवेश

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीता होले यांनीदेखील भाजपात प्रवेश केलाय

Updated: Jul 31, 2019, 12:07 PM IST
'घाऊक' भरती; पिचड, नाईक, कोळंबकर, शिवेंद्रराजे, चित्रा वाघ यांचा भाजपात प्रवेश title=

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची भाजपाच्या गोटात सामील होण्याची धडपड सुरू आहे. भाजपात अखेर आज मेगा भरती पार पडली. पिचड पिता-पुत्र, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत अखेर भाजपात प्रवेश केला. तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनीदेखील आज भाजपात प्रवेश केला. यावेळी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीता होले यांनीदेखील भाजपात प्रवेश केलाय. 

पिचड पिता-पुत्र भाजपात

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनीसुद्धा भाजपात प्रवेश केलाय. मधुकर पिचड शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद पिचड यांनी भूषवलं.


मधुकर पिचड

 

शिवेंद्रराजेही भाजपावासी

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपात प्रवेश केलाय. शिवेंद्रराजे भोसलेंसह साताऱ्याच्या ११नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय.

नारायण राणेंची निकटवर्तीय कोळंबकर भाजपात

शिवसेना, काँग्रेसमधून आता कालिदास कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केलाय. कोळंबकर १९९०पासून सलग ७ वेळा आमदार होते. युती सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी केलंय. आज कोळंबकरांसह त्यांच्या समर्थकांनीही भाजपात प्रवेश केलाय.


कालिदास कोळंबकर 

 

संदीप नाईक भाजपात

नवी मुंबईचे संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केलाय. नवी मुंबई महापालिका नगरसेवक म्हणून पहिल्यांदा नाईक निवडून आले होते. २००९, २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संदीप नाईक निवडून आले होते. आज संदीप नाईकांसह त्यांच्या समर्थकांनीही भाजपात प्रवेश केलाय. संदीप नाईक यांच्यासह सागर नाईकदेखील भाजपावासी झालेत.

उद्यापासून भाजपाची महाजनादेश यात्रा

उद्यापासून भाजपाची महाजनादेश यात्रा सुरू होतेय. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पक्षाकडून एक मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आलाय. 8980808080 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश मिळवता येणार आहे. 

दरम्यान, आजच अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं भर पावसात भाजपाच्या महाजनादेश यात्रेची तयारी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतुन महाजनादेश यात्रेचा गुरुवारी १ ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार आहे. त्यामुळे एका दिवसावर येऊन ठेपलेल्या या कार्यक्रमासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारला जात आहे. १ लाख लोक बसतील असा मंडप उभारण्याचं काम भर पावसात युद्ध पातळीवर सुरू आहे.