व्हिडिओ : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', पवार-फडणवीसांची तुफान फटकेबाजी

'अलिकडच्या काळात कोण कोणत्या पक्षात आहे, हेदेखील कळणं अवघड होऊन बसलंय'

Updated: Jul 31, 2019, 10:06 AM IST
व्हिडिओ : पक्षांतराच्या 'वाऱ्यावरची वरात', पवार-फडणवीसांची तुफान फटकेबाजी title=

मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री,. शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली... निमित्त होतं काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचं... हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा' या पुस्तकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. राज्यातल्या सत्तांतराच्या घडामोडींनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री पहिल्यांदाच एकत्र एका कार्यक्रमात शेजारी - शेजारी बसले होते. सध्या राज्यात पक्षांतराचे वारे आहेत. त्यावरुन कार्यक्रमात टोलेबाजी रंगली. 

यावेळी बोलताना, 'नुकतीच आपल्या जीभेवर आणि गळ्यावर शस्रक्रिया झालीय. त्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस न बोलण्याचा आणि कार्यक्रमांना न जाण्याचा सल्ला दिला. परंतु, सध्याची महाराष्ट्राचं वातावरण न पाहता मी जर बाहेर गेलो नाही तर अफवा पसरवल्या जातील... त्यामुळे थोडा त्रास झाला तरी जायचं असं ठरवलंय' असं म्हणत पवारांनी समोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. 

तर 'अलिकडच्या काळात कुणाबरोबर फोटो काढणीही अडचणीचं झालंय. अलिकडच्या काळात कोण कोणत्या पक्षात आहे, हेदेखील कळणं अवघड होऊन बसलंय आणि पेपरवाले काय छापतील याचा भरवसाच नाही. आम्हालाही माहीत नसतं की आमच्या पक्षात कोण येणार आहे पण पेपरमधून आम्हाला कळतं की अमूक-अमूक आमच्या पक्षात येणार आहेत' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही समोरच्या उपस्थितांना कोड्यात टाकलं.

उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत 'सरकारकडून ईडी, सीबीआय यांचा गैरवापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात असल्याची' टीका शरद पवार यांनी जाहीरपणे केली होती.

दुसरीकडे, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड आणि नवी मुंबईतले आमदार संदीप नाईक तसंच काँग्रेसचे मुंबईतले नायगावमधले आमदार कालिदास कोळंबकर भाजपात प्रवेश करत आहेत. इतकंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी ५० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपानं केलाय.