अबकी बार २२९; अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला मोठे यश मिळण्याचे संकेत

सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे.

Updated: Sep 3, 2019, 05:45 PM IST
अबकी बार २२९; अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला मोठे यश मिळण्याचे संकेत title=

मुंबई: लोकसभा निवडणुकांपाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही महायुतीला निर्भेळ यश मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष समोर आला आहे. 

सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. या पार्श्वभूमीवर विधानसभेत महायुती झाली तर काय होईल, याची चाचपणी करण्यासाठी भाजपने अंतर्गत सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये महायुतीला २२९ जागा मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता भाजप शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही असेल. 

२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपने ऐनवेळी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला सर्वाधिक १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले होते. याशिवाय, काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळवला होता.

तत्पूर्वी भाजपकडून यापूर्वीच युती होण्याचे संकेत देण्यात आले होते. शिवसेनेसोबत जागावाटपाची बोलणी करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र, हे दोघेजण मुख्यमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवणार, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 

गणेशोत्सव संपल्यानंतर १३ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होऊ शकते. यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. १३ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण १५ ऑक्टोबरच्या आसपास मतदानप्रक्रिया पार पडेल. यानंतर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.