मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह कोरोना वॉर्डमध्ये दहा ते बारा तास पडून होता, असा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भाजप नेते किरीट सोमैया, आमदार नितेश राणे आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी हा व्हिडिओ ट्वीट करून महापालिकेवर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या व्हायरल व्हिडिओबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खुलासा केला आहे. तसेच अशा व्हिडिओमुळे अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर आणि अन्य कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे महापालिकेनं म्हटलं आहे.
Now COVID Dead Bodies lying in Wards with Corona Patients at Rajawadi Hospital Ghatkopar. Similar as Sion Hospital, KEM Hospital, Shatabdi Hospital
राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर येथे कोरोना रूग्णांचा शेजारी वॉर्डमध्ये कोरोना चे मृतदेह पडून आहेत @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/nECiF0lVkU— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 24, 2020
याबाबत महापालिकेने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, कोरोना कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा सामना संपूर्ण जग करत आहे. देशात मुंबई महापालिका क्षेत्रात दुर्दैवाने सर्वाधिक रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय अक्षरशः दिवसरात्र एक करून रुग्णसेवा देत आहेत. मुंबई महापालिकेच्या अन्य खात्याचे कामगारही त्यांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे सेवा देत आहेत. असे असताना मूळ कारणमीमांसा समजून न घेता रुग्णालयातील मृतदेहांचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. रात्रं दिवस काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
This is from Rajawadi hospital !
What has really changed or we should just lose hope completely!! pic.twitter.com/Hun3AEWpvZ— nitesh rane (@NiteshNRane) May 24, 2020
राजावाडी रुग्णालयातील व्हिडिओबाबत महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अशा प्रकारांची दखल घेऊन प्रशासनाने सर्व संबंधितांना याबाबत काळजी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत आणि यंत्रणेकडून तशी सतर्कताही बाळगण्यात येत आहे. रुग्णालयात अव्याहतपणे उपचार करण्यात येत आहेत. एखाद्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर निर्धारित वैद्यकीय उपचार क्रमांनुसार रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंतिम तपासणी आणि नोंद करण्याची एक प्रक्रिया आहे. या निर्धारित प्रक्रियेस काही निश्चित कालावधी लागतो.
After Sion hospital, this is Rajawadi hospital of Ghatkopar where deadbody is lying for hours in an open patient ward.#BMC officials incharge particularly the dean of the hospital must be sacked immediately for this inhuman act.#Shamefull #COVID19 pic.twitter.com/N5HicGt07w
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 24, 2020
रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तपासणी आणि अंतिम नोंद होऊन मृतदेह निर्देशित वैद्यकीय पद्धतीनुसार वेष्ठनात पॅकबंद करणे गरजेचे असते. त्याचवेळी संबंधितांच्या नातेवाईकांना कळविणे आवश्यक असते. त्यानंतर नातेवाईकांकडून मृतदेह ताबडतोब ताब्यात घ्यायला हवा. पण काही वेळा नातेवाईकांकडून लगेच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वेळ जातो आणि या व्यवहार्य अडचणी आहेत, असे महापालिकेनं म्हटलं आहे.
अशा अडचणी उद्भवल्या नाहीत आणि सर्व प्रक्रिया सुलभ झाली तरीही या सर्व प्रक्रियेसाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. तसेच ही प्रक्रिया संबंधित रुग्ण उपचारासाठी ज्या खाटेवर असेल, त्याच खाटेवर करणे संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक असते, असे महापालिकेनं म्हटलं आहे.
सर्व प्रक्रिया करत असताना वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक ती सर्व दक्षता काटेकोरपणे व नियमितपणे घेतली जात आहे. प्रत्येक रुग्णाला अत्यंत जबाबदारीने तपासले जाते आणि त्याच्यावर आवश्यकतेनुसार यथायोग्य उपचार देखिल केले जात आहेत. महापालिकेची रुग्णालये जनतेसाठी खुली असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी असणे स्वाभाविक आहे. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारीही गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन नियमितपणे रुग्णसेवा देत असतात. गर्दी अधिक असल्यास ते विनातक्रार अधिक वेळेपर्यंत रुग्णसेवा देत असतात, असे महापालिकेने म्हटले आहे.
कोरोना संकटाच्या काळात रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचारी हे आपल्या घरी न जाता रुग्णालयात किंवा जवळपास ज्या ठिकाणी निवासव्यवस्था केली आहे अशा ठिकाणी राहत आहेत. रुग्णसेवा करत असताना अनेकांनी तर गेल्या कित्येक दिवसांत आपल्या कुटुंबीयांची, मुलाबाळांची भेटही घेतलेली नाही. अशा परिस्थितीत असे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे केवळ त्यांच्याच मनोबलावर नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावरही मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाब बृहन्मुंबई महापालिकेने अधोरेखित केली आहे. त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.