BMC Job: मुंबई पालिकांच्या शाळांमध्ये शिपाई, माळी, सिक्योरिटी गार्डची हजारो पदे रिक्त

BMC Job: मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागात हजारो पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे तात्काळ भरली गेल्यास हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 20, 2023, 01:08 PM IST
BMC Job: मुंबई पालिकांच्या शाळांमध्ये शिपाई, माळी, सिक्योरिटी गार्डची हजारो पदे रिक्त title=

BMC Job: मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागात हजारो पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे तात्काळ भरली गेल्यास हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. 

मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिपाई, हमाल आणि माळी - रखवलदार यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मुंबई पालिका शाळेत शिपाईची एकूण 1797 पदे रिक्त आहेत. हमालाची 391 तर माळी आणि रखवलदारांची 122 पदे रिक्त आहेत.  यानिमित्ताने बेरोजगार युवकांना या संधीचा लाभ देण्याची गरज व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली होती. त्यानंतर ही पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी - रखवलदार या पदांची आकडेवारी उपलब्ध करुन दिली. 

यात शिपाईची एकूण मंजूर पदे 2635 असून रिक्त पदांची संख्या 1797 आहे. हमाल ही पदे 602 असून सध्या 391 पदे रिक्त आहेत तर माळी आणि रखवलदारांची 122 पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या 231 आहे. मुंबईत हजारो कमी शिक्षण झालेले नागरीक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना ही संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. 

प्रत्येक शाळेत शिपाई ही पदे महत्वाची असून आज मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाही. यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. 

यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढविला असून रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. त्यामुळे महत्वाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणीदेखील गलगली यांनी पत्राद्वारे केली आहे. 

इतके दिवस ही पदे का रिक्त ठेवली? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान आता या रिक्त पदांबाबत मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभाग काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.