अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घालत घोषणाबाजी केली.

Updated: Feb 25, 2019, 12:05 PM IST
अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार title=

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणानं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घालत घोषणाबाजी केली. राज्यपाल आरएसएसचे समर्थन करतात त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यपालांच्या अभिभाषणात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलेलं नाही. राज्यातील जनतेची या सरकारनं पाच वर्ष फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशाची सुरुवात वादळी ठरली आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, भरती, विकास आराखडा आणि भ्रष्टाचाराचे आरोप या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधत आक्रमक पाहायला मिळू शकतात. तर सरकारकडून काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विरोधक विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका करत आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता. चहापान हे सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी यात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. २७ फेब्रुवारीला केवळ लेखानुदान सादर होईल. त्यानंतर २८ फेब्रुवारीला चर्चा होणार आहे. लेखानुदानात नवीन योजना जाहीर केल्या जात नाहीत. यात फक्त एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद असते. पूर्ण अर्थसंकल्प जूनच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर 1 मार्चला चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार उत्तर देणार आहे. अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.