मुंबई : अमरावतीच्या आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीचे आणि रवी राणांवर (MLA Ravi Rana) दाखल झालेल्या गुन्ह्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. रवी राणा दिल्लीत असताना त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल कसा झाला असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केला. गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी फोन करून गुन्हा दाखल करण्यास दबाव आणला असा आरोप रवी राणा यांनी केला.
आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला गेला. याचे पुरावे माझ्याकडे असून खोटं बोलत असेलतर मला सभागृहातच फाशी द्या असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.
या मुद्द्यावर आमदार रवी राणा यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. मनपा आयुक्तांवर शाई फेकली याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचा आम्ही निषेध करतो, पण त्या दिवशी मी दिल्ली होतो, एका बैठकीमध्ये उपस्थित असताना मला फोन येतो की अमरावतीत तुमच्यावर 307 आणि 353 असा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मी यासंदर्भात माहिती घेतली तेव्हा पोलीस आयुक्त आर पी सिंग यांनी सांगितलं की त्या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांनी मला गुन्हा दाखल करायला लावला आणि रवी राणाला अटक करा असं म्हटलं.
त्यानंतर 100 ते 150 पोलीस माझ्या घरी येतात, माझ्या घरी वृद्ध आई-वडिल असताना रात्री तीन वाजता पोलीस घरात घुसून तपासणी करतात, खासदार नवनीत राणा यांनाही ताब्यात घेतलं जातं, हा खासदारांचा सुद्धा अपमान आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी सूचना केल्या माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आहे, असा गंभीर आरोप यावेळी रवी राणा यांनी केला आहे.
या लोकांनी फोन करुन रवी राणाला अटक करा असं सांगितलं. आर आर पाटील यांची आज मला आठवण येते, आर आर पाटील यांच्यासारखे गृहमंत्री आज राज्याला हवे आहेत. या राज्यात जर तुम्ही सचिन वाझेसारखे अधिकारी बनवत असाल तर तुमचाही अनिल देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही, असा संतापही रवी राणा यांनी व्यक्त केला.
अधिकारी म्हणतात आमच्यावर एवढं प्रेशर आहे की रवी राणा दिसले तर त्यांना गोळी घाला, माझ्या सारख्या आमदारावर गुन्हा दाखल होतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री फोन करतायत हे महाराष्ट्राचं दुर्देवं असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले
आमदार रवी राणा यांच्यावर दिल्लीत असताना गुन्हा दाखल का झाला याची चौकशी करणं गरजेचं आहे, रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव किंवा सूचना नव्हती असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलंय. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची घोषणा यावेळी गृहमंत्र्यांनी केली.