छात्र परिषदेला आदित्य ठाकरेंची पाठ

या परिषदेला उमर खालीदची उपस्थिती 

Updated: Jan 4, 2020, 10:25 AM IST
छात्र परिषदेला आदित्य ठाकरेंची पाठ  title=

मुंबई : मुंबईत आज CAA, NRC आणि NRP विरोधात छात्र परिषद आयोजित करण्यात आली होती. या छात्र परिषदेत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेनेने दिली आहे. ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने रविवारी मुंबईत CAA, NRC आणि NPRविरोधी छात्र परिषदेचं आयोजन करण्यात  आले आहे. या परिषदेला उमर खालीद आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात असंतोषाचं वातावरण आहे.

आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे  यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा कार्यक्रम उपस्थितीसाठी आमच्या मध्यवर्ती कार्यालयासोबत समन्वय साधावा, असं ट्विट करून आदित्य ठाकरे जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

आयोजकांनी आदित्य ठाकरे येणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र आदित्य ठाकरेंची कोणतीही वेळ न घेता किंवा न विचारता निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. 

या परिषदेला देशभरातून विद्यार्थी येणार आहेत. यात दिल्लीचे छात्र नेते उमर खालीद, पूयीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, जेएनयुचे नेता रामा नागा यांच्यासह छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे उपस्थित राहाणार असून गीतकार जावेद अख्तर, मंत्री आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, आमदार कपील पाटील, आमदार रोहीत पवार यांना देखील आमंत्रित केल्याची माहिती निमंत्रण पत्रिकेत दिली आहे.