मोठी बातमी: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून रेल्वे सुरु होणार

रेल्वेकडून रविवारी रात्री उशीरा यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. 

Updated: Jun 15, 2020, 12:30 AM IST
मोठी बातमी: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून रेल्वे सुरु होणार title=

मुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. रेल्वेकडून रविवारी रात्री उशीरा यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १५ तारखेपासून लोकल ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सुरु कराव्यात, यासाठी आग्रही होते. त्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर रेल्वेने राज्य शासनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अप आणि डाऊन मार्गावर दिवसभरात १२ ट्रेनच्या माध्यमातून एकूण १२० फेऱ्या चालवण्यात येतील. सकाळी साडेपाच ते रात्री ११.३० या वेळेत १५ मिनिटांच्या अंतराने ट्रेन सोडण्यात येतील. चर्चगेट ते विरार या मार्गावर सर्वाधिक फेऱ्या चालवण्यात येतील. तर विरार-डहाणू मार्गावरही काही फेऱ्या चालवण्यात येतील. चर्चगेट आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान सर्व रेल्वे जलद असतील. बोरिवलीनंतर सर्व ट्रेन धीम्या होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

तर मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी १०० फेऱ्या चालवण्यात येतील. तर सीएसएमटी पनवेल मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी ३५ फेऱ्या चालवण्यात येतील. या सर्व ट्रेन जलद गाड्यांप्रमाणे मोजक्याच स्थानकांवर थांबतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत अनेक दैनंदिन व्यवहारांना मुभा देण्यात आल्यानंतर मुंबईतील बेस्ट सेवेवर ताण येताना दिसत होता. लोक बसने जाण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी करत होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. याशिवाय, लांब राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसचा प्रवास जिकीरीचा पडत होता. मात्र, आता रेल्वे सेवा सुरु झाल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.