मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच! कधी सुरु होणार वाहतूक? मध्य रेल्वेने दिली माहिती

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे.

Updated: Apr 16, 2022, 08:01 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच! कधी सुरु होणार वाहतूक? मध्य रेल्वेने दिली माहिती title=

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री झालेल्या अपघाताचा परिणाम लोकल वाहतूक सेवेवरही दिसून येतोय. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावरून तूर्तास वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहतूक सुरु होण्यासाठी प्रवाशांना 12 वाजेपर्यंत वाट पाहू लागण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी झी 24 तासशी बोलताना विस्कळीत वाहतूक 12 वाजेपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली आहे.

शिवाजी सुतार म्हणाले, हे सर्व काम 12 वाजतापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्याच्या परिस्थितीत स्लो मार्गावरील वाहतूक सुरु आहे. ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत या स्लो मार्गावर भायखळा ते माटुंगा या स्थानकांदरम्यान वळवण्यात आल्या आहेत. काम सध्या सुरु असून माटुंगा ते भायखळा जलद मार्गावर वाहतूक बंद आहे.

प्रवाशांना आवाहन करताना शिवाजी सुतार म्हणाले, धिम्या मार्गावरील वाहतूक सुरु आहे. पुढच्या पाच तासांमध्ये ही अडचण पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

काल रात्री 10 वाजताच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ मोठी घटना घडली. एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात झाला. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर गदग एक्सप्रेस- पाँडेचरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या.

या अपघातात एक्सप्रेस गाडीचे 3 डब्बे घसरले. सुदैवाने या अपघातात कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.