मुंबई : मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबाईतील मराठा मोर्चा ला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याचा आयोजकांना विश्वास आहे. मुंबईत 500 शाळांना सुटी तर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
वीरमाता जिजाऊ उद्यान (राणी बाग) ते आझाद मैदान अशा राज्यातील शेवटच्या मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आयोजकांनी तयारी पूर्ण केली असून वॉररूम सज्ज आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांचीही जय्यत तयारी पूर्ण झालीय. आता उत्सुकता आहे, ती अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची. 25 लाख मराठा राज्यभरातून या मोर्चासाठी मुंबईत येतील, असा विश्वास आयोजकांनी तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही व्यक्त केला आहे. राज्यभर आजवर निघालेले 57 मोर्चे अतिशय शांततेत पार पडल्याने कायदा-सुव्यवस्थेची चिंता नसली तरी निश्चितच सरकारच्या उरात धडकी भरणार आहे. मुंबईचे डबेवाले 126 वर्षात प्रथमच सुटी घेऊन मोर्चात सामील होणार आहेत. माथाडी कामगार संघटना व वाशीतील व्यापाऱ्यांनी मोर्चास पाठिंबा म्हणून एपीएमसीतील पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.