खासदार सुप्रिया सुळे यांना कोणी सांगितलं 'घरी जा आणि स्वयंपाक करा'

'कशाला राजकारणात रहाता, घरी जा आणि स्वंयपाक करा' 

Updated: May 25, 2022, 03:22 PM IST
खासदार सुप्रिया सुळे यांना कोणी सांगितलं 'घरी जा आणि स्वयंपाक करा' title=

मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. ओबीसींना आरक्षण छगन भुजबळच देऊ शकतील, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात केलं आहे. तसंच ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजप (BJP) जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले कुणाला भेटले आणि दोन दिवसात असं काय मध्यप्रदेशच्या सरकारने केलं कि त्यांना न्याय देण्याची फसवाफसवी झाली आणि महाराष्ट्रावर अन्याय झाला याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

'घरी जा आणि स्वंयपाक करा'
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. कशाला राजकारणात रहाता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही कळत नाही का एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का एक शिष्टमंडळ पाठवायची, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

तसंच 'तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या' अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

तुम्ही पुन्हा पुन्हा खोटं बोला, आता लोकं नुसते मोर्चे काढत आहेत, नंतर बदडतील तुम्हाला असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 

राज्य सरकार ओबीसी समाजाची फसवणूक करत आहे, इम्पिरिकल डाटा गोळा करणं आणि न्यायालयात सादर करणं जमणार नाही आणि जमलं तर कोर्ट म्हणेल हा इम्पिरिकल डेटा पुढच्या निवडणुकीसाठी वापरा. या निवडणुकीत आता राजकीय आरक्षण असू शकत नाही. त्यामुळे भाजपने निर्णय घेतला आहे २७ टक्के जागा ओबीसी कार्यकर्त्यांना देणार आणि मग ओबीसी समाज या सर्वांना घरची वाट दाखवणार असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.