अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा हट्ट सोडा- मराठा सेवा संघ

परिणामी शिवस्मारकही तीन ते चार महिन्यांसाठी बंद ठेवावे लागेल.

Updated: Oct 26, 2018, 09:44 AM IST
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा हट्ट सोडा- मराठा सेवा संघ title=

मुंबई: अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्यावेळी बोट उलटून झालेल्या अपघातानंतर आता मराठा सेवा संघाने नवी मागणी केली आहे. राज्य सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा अट्टाहास सोडावा. त्याऐवजी राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधावे, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी एका वृत्तवाहिनशी बोलताना सांगितले. 

मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अरबी समुद्राऐवजी राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे खेडेकर यांनी सांगितले.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेली जागा मुळात चुकीची आहे. तसेच पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे बोट सेवा बंद असते. परिणामी शिवस्मारकही तीन ते चार महिन्यांसाठी बंद ठेवावे लागेल. 

याशिवाय, इतर दिवशीही भरती-ओहोटीच्या गणितावर बोट सेवेचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे बोट सेवेचे दर चढे राहतील. ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना हे दर परवडतील की नाही, याबद्दल शंका आहे. याउलट राजभवनाच्या जागेवर स्मारक बांधल्यास अनेक प्रश्न सुटतील, असे मत खेडेकर यांनी व्यक्त केले. 

'मुख्यमंत्री आणि विनायक मेटेंनी राजीनामा द्यावा'

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या अपघातात एका शिवभक्ताचा नाहक जीव गेला. त्यामुळे याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी, असेही संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगण्यात आले.