Ranichi Baug : मुंबईतील राणीची बाग नावात पुन्हा बदल, आता हे असणार नावं

Mumbai Zoo : मुंबईच्या भायखळ्यातील ( Byculla) राणी बागेला (Ranichi Baug) आता नवी ओळख मिळणार आहे.  

Updated: Dec 15, 2022, 10:17 AM IST
Ranichi Baug : मुंबईतील राणीची बाग नावात पुन्हा बदल, आता हे असणार नावं title=
छाया सौजन्य - themumbaizoo

Mumbai Zoo : मुंबईच्या भायखळ्यातील ( Byculla) राणी बागेला (Ranichi Baug)आता नवी ओळख मिळणार आहे. राणी बागेच्या नावात आता वनस्पती उद्यान जोडलं जाणार आहे. 'वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय'  (Veermata Jijabai Bhosale Udyan) असं आता त्याचं अधिकृत नाव होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी 12 डिसेंबरला मंजुरी दिली. 

राणीच्या बाग नावात 'वनस्पती' जोडण्यात आलेय

राणी बागेला (Ranichi Baug) 160 वर्षं पूर्ण होत आहेत. त्याच महिन्यात नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आलीय. व्हिक्टोरिया गार्डन असं नाव असणाऱ्या या बागेचं 1969 मध्ये 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान' (Veermata Jijabai Bhosale Udyan)असं नामकरण झालं. त्याला 1980 च्या दशकात प्राणीसंग्रहालय जोडलं गेलं. आणि आता 2022 मध्ये या नावात 'वनस्पती' जोडण्यात आलंय. ऐतिहासिक वारसा अशी ओळख मिळालेल्या या परिसरात  चार हजाराहून अधिक विविध प्रकारची झाडं आहेत.

मुंबईच्या मध्यभागी असलेले एक स्वर्गीय ठिकाण म्हणजे मुंबई प्राणिसंग्रहालय. भायखळा येथे  60 एकर क्षेत्र व्यापलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (Veermata Jijabai Bhosale Udyan and Zoo) जे मुंबई प्राणिसंग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. या मुंबई प्राणिसंग्रहालयात शेकडो वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. 60 एकर क्षेत्रफळात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात साधारणपणे 6600 पेक्षा जास्त झाडे आणि 350 हून अधिक विविध प्रजातींच्या प्राण्यांचा वास आहे. भारतातील सर्वात जुन्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असलेले हे प्राणिसंग्रहालय आहे.

 या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग (Ranichi Baug) ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत पाहायला मिळते. या बागेचे उद्‌घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि ही बाग जनतेसाठी खुली झाली. 2012 साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.

राणीच्या बागेत विविध प्रकारची झाडे, झुडपे, लतावेळी आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा साठा असून हा अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे 286  प्रजातींच्या 3213 वृक्षांचे आणि 853 वनस्पती असे साधारण 6600 पेक्षा जास्त झाडे येथे पाहायला मिळतात. त्यामुळेच राणी बागेच्या नावात आता 'वनस्पती' जोडण्यात आले आहे.  

ऑनलाईन आणि घरबसल्या तिकीट बुकिंगची सेवा

राणीच्या बागेकडून अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo) कडून आता प्रवेशासाठी ऑनलाईन आणि घरबसल्या तिकीट बुकिंगची सोय सुरु करण्यात आली आहे. (इथं https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in ऑनलाईन बुकींग करु शकता ) मागील काही दिवसांतील राणीच्या बागेला भेट देण्यासाठी येणार्‍यांची संख्या पाहता मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, राणीच्या बागेमध्ये पेंग्विन पाहणे हे खास आकर्षण आहे. त्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी दिसून येत आहे. राणीच्या बागेत 2022  या वर्षामध्ये 3 पेंग्विन्सचा जन्म झाला.