'हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार' एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक

ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी

Updated: Jul 4, 2022, 08:21 PM IST
'हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार' एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक title=

CM Eknath Shinde Live :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव झाला. या चाचणीमध्ये शिंदे गट आणि भाजपने 164 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडे केवळ 99 मतं होती. 

यानंतर अधिवेशनात तुफान फटकेबाजी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

त्यानंतर भर पावसात मुख्यमंत्री शिवाजी पार्कातील स्मृतिस्थळाकडे रवाना झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर ते नतमस्तक झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी पारित झाला आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार आजच्या विश्वासदर्शक ठरावात बहुमताने पास झालं आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादाने आलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या राज्याला पुढे नेणार आहेत. आणि म्हणून आज बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार, शिवसेना-भाजप युतीचं सरकार आज स्थापन झालं आहे अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

तसंच या राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं काम होईल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, समाजातील सर्व घटक असतील या सर्वांना हे सरकार न्याय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाण्यात स्वागताची जोरदार तयारी
यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहरात जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ठाणे शहरात येत असल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचं दर्शन घेतील. टेम्भी नाका इथल्या आनंदाश्रमला भेट देणार आहेत.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या लुईसवाडी इथल्या 'शुभ-दिप' या निवास्थानी जातील. यावेळी ठाणे शहरातील समस्त शिवसैनिक आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.