सत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार का ?

शैलेश मुसळे | Updated: Nov 25, 2019, 02:06 PM IST
सत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा title=

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. रविवारी रात्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते आमदारांसोबत बोलत होते. रविवारी उशिरा रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. दुसरीकडे विरोधकांमध्ये ही भेटीगाठी सुरु होत्या.

महाराष्ट्रामध्ये मोठ्य़ा राजकीय हालचाली सुरु आहेत. सत्तास्थापनेसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. आज मुख्यमंत्र्यांनी पदभार सांभाळला. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असू शकते. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करणार का याकडे देखील लक्ष लागलं आहे.

परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील राजकारण चालतं. शेतकऱ्यांसाठी जर मोठी घोषणा केली तर याचा फायदा भाजपला होईल असं भाजपला वाटत असेल. त्यामुळे आता ही घोषणा होते की नाही याकडे लक्ष लागलं आहे.