मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार आलं आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकाचं कंबरडं मोडलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही समस्या लक्षात घेतली. युतीचं सरकार सत्तेत येताच मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
'आपल्या सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करू आणि बळीराजाच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, चुकीची कामं करणार नाही. कोणावरही आकस बुद्धी ठेवणार नाही.
आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्तेच राहणार. या राज्यांचं सर्वांगिन काम करणारं सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू. आम्हाला कधीही ग ची बाधा होऊ देणार नाही.'
तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी युती सरकार प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी विधिमंडळात दर्शवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता याबाबत निर्णय कधी होणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे.