'हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेचं उत्तर, म्हणाले आम्ही...

उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले...   

Updated: Jul 1, 2022, 10:48 PM IST
'हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेचं उत्तर, म्हणाले आम्ही... title=

Maharashra Shinde Government : अडीच वर्षापूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठित वार करुन शिवसैनिकांमध्य संभ्रम निर्माण करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनाला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर
झी 24 तासला दिलेल्या एक्स्लूझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आनंद दिघेंचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेचे आमदार आहोत, आज विधीमंडळ पक्षामध्ये दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत आहेत, यावरुन चित्र स्पष्ट आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

आम्ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो आहे, हिंदुत्त्वाची भूमिका घेऊन पुढे चाललो आहे आणि आम्ही कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही आम्ही कोणत्याही उलट्या सुलट्या पक्षात गेलो नाही, ज्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर आज युती केली आहे. ही नैसर्गिक युती आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कोणताही संभ्रम निर्माण करुन घेऊ नये असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

राज्यपालांनी रविवारी शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत नंबर आणि बहुमत हे महत्त्वाचं असतं, आज आमच्याकडे पन्नास आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीकडे 120 आमदार आहेत, 170 हा आकडा खूप मोठा आहे, बाकी सर्व प्रक्रिया औपचारीक आहे, त्यामुळे आम्हाला कोणतीही धास्ती किंवा भीती नाही, यश आणि विजय हा आमचाच आहे. 

राज्याच्या हिताचे प्रकल्प करणार
माझा राग मुंबईवर काढू नका, आरेचा आग्रह रेटू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नविन सरकारला केलं होतं. यावर बोलताना राज्याच्या जनतेचं हित आणि राज्याचं हित ज्या प्रकल्पांमध्ये तेच राज्यसरकार करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारचा संकल्प
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र असा संकल्प राज्य सरकारने केला आहे. शेतकऱ्यांना भरपूर मदत करणं, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं, पारंपारिक शेतीबरोबर नवनविन पुरक उद्योग शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणं आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी जी काही पावलं उचलायची आहेत ती उचलण्याचं काम राज्य सरकार करेल, 

जलसंपदाचे जे प्रकल्प रखडले असतील ते पूर्णत्वास नेणं, जेणेकरुन जमीन मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली येईल, यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते युद्धपातळीवर राज्य सरकार करेल असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.