पोलिसांसाठी सिडकोच्या ४,४६६ घरांच्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पोलिसांसाठी ४४६६ घरे राखीव ठेवून त्याची लॉटरी काढली जाणार

Updated: Jul 27, 2020, 11:49 PM IST
पोलिसांसाठी सिडकोच्या ४,४६६ घरांच्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पोलिसांसाठी ४,४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तर सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ देखील करण्यात आला.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच ४४६६ घरे पोलिसांसाठी राखीव ठेवून त्याची लॉटरी काढली जात आहे. यासाठी उद्यापासून फॉर्म भरता येणार आहेत. कमी किंमतीत चांगली घरे या योजनेतून मिळणार आहेत. पुढेही टप्याटप्याने पोलिसांसाठी राखीव घरे ठेवली जातील.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार प़डली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.