मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे

मराठा आरक्षणबाबत आजच्यासारखी बैठक जर यापूर्वी घेतली असती तर आजची परिस्थिती आली नसती. 

Updated: Sep 11, 2020, 07:55 PM IST
मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ते केवळ पोकळ वल्गना करत असल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली. सरकार या मुद्द्यावर सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मात्र, विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांचे हे सर्व दावे फेटाळून लावले. मराठा आरक्षणबाबत आजच्यासारखी बैठक जर यापूर्वी घेतली असती तर आजची परिस्थिती आली नसती. मराठा संघटनांबरोबर घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. आम्ही बांधील आहोत, कटिबद्ध आहोत अशा पोकळ वल्गना केल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले. 

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल - शिवेंद्रराजे भोसले

या बैठकीला उपमुख्यमंत्री  अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात उपस्थित होते.