मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रविवारचा प्रस्तावित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे.

Updated: Jun 13, 2020, 11:11 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रायगड दौरा रद्द title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रविवारचा प्रस्तावित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे प्रशासन पंचनामे आणि इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप आणि साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झालं आहे. हे मदतकार्य अधिक वेगाने होणं महत्त्वाचं असल्यामुळे हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगडचा दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार होते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री मदतीचं वाटप करणार होते. चौल, बोर्ली, मुरुड येथे मुख्यमंत्र्यांकडून वादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करण्यात येणार होतं.

याआधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवार ५ जून रोजी अलिबागला गेले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबईतल्या भाऊचा धक्का येथून मुख्यमंत्री रोरो बोटीने अलिबागला गेले होते. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती. ही सुरुवात आहे, याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. बुधवारी केंद्रीय पथकाकडून महाड, मंडणगड, आंबडवे, केळशी, आडे, पाजपंढारी, दापोली, मुरुड, कर्दे या भागात नुकसानीचा पाहाणी करेल.