एसटी संदर्भात तक्रारी आहेत, परिवहन मंत्र्यांनी दिलेत हे आदेश

प्रत्येक एसटी बसमध्ये संबंधीत आगाराच्या प्रमुखांचे फोन नंबर झळकणार आहे. 

Updated: Feb 6, 2020, 11:03 PM IST
एसटी संदर्भात तक्रारी आहेत, परिवहन मंत्र्यांनी दिलेत हे आदेश title=
संग्रहित छाया

मुंबई  : प्रत्येक एसटी बसमध्ये संबंधीत आगाराच्या प्रमुखांचे फोन नंबर झळकणार आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकारण तातडीने करण्यासाठी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावा लागणार आहे. तसे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. 

दररोज एसटीने सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. एसटीच्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये काम करीत असतांना, ग्राहकाचे महत्तम समाधान  हेच अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे, असे ते म्हणालेत.

प्रवासी हा ग्राहक आहे. ग्राहकाच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्वाचे आहे, असे ही ते म्हणाले. 

 एसटी बसमध्ये आगार प्रमुख आणि विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे शासन परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.