Kharghar Death Case : खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. तसेच याआधी पत्र पाठवून अजित पवार यांनी याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती.
दरम्यान, खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमनेसामने आले आहेत. खारघार दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला होता. त्यामुळे त्याप्रकरणातही आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा का, असा प्रतिसवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे खारघर दुर्घटनेवरून राजकारण तापू लागले आहे. या घटनेत 50 पेक्षा जास्त जणांचा बळी गेल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे शिंदे गटाने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मरिन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आलेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले आहे. यापैकी एका महिलेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट 'झी 24 तास'च्या हाती लागला आहे. या रिपोर्टमध्ये हा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचं नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला. यावेळी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो श्रीसदस्य उपस्थित होते. काही जण आदल्या दिवशीच्या रात्रीच मैदानावर उपस्थित राहिले होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी उन्हापासून बचाव करण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे हजारो श्रीसदस्य उन्हात बसलेले होते. यामुळे कडक ऊन आणि तीव्र उन्हाच्या झळा यामुळे काहींना उष्माघाताचा त्रास झाला. याच उष्माघातामुळे तब्बल 14 जणांना आपला जीव गमववला.
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच कडक उन्हामुळे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.