काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, युतीच्या वादावर महत्वाची भेट!

भाजप - शिवसेना युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे काँग्रेस आघाडीचे नेते सावध झाले आहेत.  

Updated: Oct 31, 2019, 11:32 AM IST
काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, युतीच्या वादावर महत्वाची भेट! title=

मुंबई : भाजप - शिवसेना युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे काँग्रेस आघाडीचे नेते सावध झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे तीन प्रमुख नेते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. युतीकडे बहुमत आहे. मात्र, सत्तेतील वाटा किती मिळणार यावरुन युतीत तणाव आणि वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्तेतील जागा वाटपावरुन शिवसेना आणि भाजपाचे जुळलेच नाही तर काय भूमिका घ्यायची याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

सध्या दोन्ही काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. काल रात्रीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यात सध्याच्या राजकीय स्थितीवर दोन्ही पक्षांची चर्चा झाली.