मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख घसरत आहे. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात १ हजार ९०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९७.५९ टक्के इतकं झालं आहे.
आज राज्यात ८०९ रुग्णांची नोंद झाली. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ इतका आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ४३२ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर ९३३ जण संस्थात्मक क्वारंटाईमध्ये आहेत. राज्यात सध्या १५ हजार ५५२ सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३२१० सक्रीय रुग्ण आहेत. नंदूरबार १, धुळे १, वाशिम २, बुलडाणा ७, यवतमाळ ५, भंडारा २, गोंदिया २, गडचिरोली ३ आणि वर्ध्यात ६ सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात २६७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४२० जण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मुंबईत ३६८९ सक्रिय रुग्ण असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५९५ दिवसांवर गेला आहे.
सध्या दिवाळीनिमित्ताने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्याच रेल्वेचं दैनंदिन तिकिट मिळू लागल्याने लोकलमध्येही गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं जास्त गरज आहे.