कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती

राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.  

Updated: Feb 21, 2021, 09:07 PM IST
कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती

मुंबई : राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग. कोरोनामुळे सुमारे 2 कोटी लोकांच्या रोजगारावर (Job) संक्रांत येण्याची भीती आहे. कोविड-19च्या (Covid-19) साथीनं सगळ्या जगाला हैराण केले आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा कामगार क्षेत्राला बसणार असल्याचं समोर आले आहे. (Corona crisis: Fear of employment for 2 crore people)

मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. यात 2030 सालापर्यंत भारतातील तब्बल 1 कोटी 80 लाख लोकांना आपला रोजगार कायमस्वरुपी बदलावा लागणार आहे. फूड सर्व्हिस, हॉस्पिटॅलिटी आणि ऑफीस अॅडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रांमध्ये काम करणारे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनंही कोरोनाची साथ ओसरल्यानंतरही याचा परिणाम कामगार क्षेत्राला जाणवत राहील, असे म्हटले आहे.  

भविष्यात काय होणार?

आगामी काळात रिमोट वर्किंग किंवा वर्क फ्रॉम होमचं प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक राहील. ई-कॉमर्स आणि ई-इंटरॅक्शनवर सर्वाधिक भर असेल. याचा परिणाम अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कामगारांवर होणार आहे. एका आकडेवारीनुसार 2020च्या पहिल्या तिमाहीत जगभरातील कामगार उत्पन्नात 10 पूर्णांक 7 टक्के, म्हणजे अंदाजे 3 हजार 500 अब्ज डॉलर्सची घट झालीये. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांमध्ये हे नुकसान 15 पूर्णांक 1 टक्क्याच्या आसपास आहे.कोविड लॉकडाऊनमुळे कामाच्या तासांमध्येही घट झालीये. याचा परिणाम कामगारांच्या उत्पन्नावर झाला आहे. 

जगभरात कोरोनाची साथ, त्यामुळे येणारं आजारपण आणि लसीकरणाची चर्चा आहे. मात्र साथ ओसरल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स जास्त जाणवणार असल्याचं ही आकडेवारी सांगते. देशातील गोरगरीब कामगारांना याचा कमीत कमी फटका बसावा, यासाठी सरकारनं आतापासून पावलं उचलणं आवश्यक आहे.