Local Train : दोन लसधारकांसाठी मोठी बातमी, रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

रेल्वे प्रसासनाने गेतला आणखी एक मोठा निर्णय, प्रवास होणार अधिक सुखकर 

Updated: Nov 11, 2021, 07:18 AM IST
Local Train : दोन लसधारकांसाठी मोठी बातमी, रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा निर्णय  title=

मुंबई : लसीकरणानंतर आता जीव हळू हळू पूर्ववत होत आहे. दोन लस मात्रा घेतलेल्या नागरिकांसाठी काही गोष्टी सुरळित होत आहेत. यातच रेल्वे प्रशासनाने लोकलबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

दोन लस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच 'मोबाइल तिकीट अ‍ॅप' सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे.  युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी) मोबाइल तिकीट अ‍ॅप जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता लोकलने प्रवास करणे अधिक सोईचे होणार आहे. 

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (Universal Pass) तिकीट अ‍ॅपशी जोडण्याचा रेल्वेचा विचार

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा सुरू करण्यावर चर्चा झाली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात आली.

सुरुवातीला मासिक पास तर त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या सूचनेनंतर तिकीट सुविधाही उपलब्ध करून दिली. एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सेवा आणि मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा बंद असल्याने पास आणि तिकीट काढण्यासाठी काही स्थानकांत तिकीट खिडक्यांसमोर गर्दी होऊ लागली. कोरोनाचे रूग्ण कमी झालेत पण धोका कमी झालेला नाही. अशावेळी गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे मोबाइल तिकीट अ‍ॅपची सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सुनीत शर्मा यांची मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर बैठक झाली. या बैठकीत उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी 'मोबाइल तिकीट अ‍ॅप' सेवा उपलब्ध करण्यावर चर्चा झाली. यातून प्रवाशांना तिकीट व पास उपलब्ध केल्यास तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सुकर प्रवासासाठी ही सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शर्मा यांनी मध्य व पश्चिम रेल्वेला दिल्या.