कोरोनाबाबत शाळां-कॉलेजना सुट्टी देण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार?

कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर शाळा-कॉलेजना सुट्टी देण्याची आणि परीक्षा लांबणीवर टाकण्याची चर्चा

Updated: Mar 11, 2020, 08:45 PM IST
कोरोनाबाबत शाळां-कॉलेजना सुट्टी देण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार? title=

मुंबई : कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर शाळा-कॉलेजना सुट्टी देण्याची आणि परीक्षा लांबणीवर टाकण्याची चर्चा जोर धरू लागली होती. याची राज्य सरकारनंही गंभीर दखल घेऊन आज विशेष बैठक बोलावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचीही बैठक घेतली. 

याशिवाय मुंबईतील नामांकित रुग्णालायाच्या डॉक्टरांना पाचारण करून त्यांच्याशीही चर्चा केली. या बैठकीत शाळा-कॉलेजना सुट्टी देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

शाळांना सुट्टी देण्याबाबत डॉक्टरांचा काय सल्ला?

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत शाळा-कॉलेजना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी मीडियाशी बोलताना दिली. 

कोरोना व्हायरसमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती आहे. असं असलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जनतेनं याबाबत खबरदारी घ्यावी, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 

जनतेनं कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत वेगवेगळ्या पद्धतीनं जाहिरात करून सरकार माहिती देणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

आयपीएलबाबत हे पर्याय विचाराधीन

आयपीएल क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवावी किंवा पुढे ढकलावी यापैकी एक निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 

आयपीएल सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे आयपीएल सामने काळजी वाढवणारे ठरतील. 

म्हणून सामन्याची तिकीट विक्री करू नये आणि सामने प्रेक्षकांशिवाय खेळवावेत. त्याचे थेट प्रक्षेपण होईल आणि प्रेक्षक घरी बसून पाहतील, असं टोपे यांनी सांगितलं. अन्यथा दुसरा पर्याय आयपीएल स्पर्धा पुढे ढकलावी असा आहे. याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.

सभा, समारंभ रद्द होणार?

कोरोना व्हायरसची भीती लक्षात घेऊन सर्व सभा, समारंभ रद्द करण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. राजकीय सभा, समारंभही रद्द करावेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.