कोरोना : लालबाग मार्केट परिसर पाच दिवसांसाठी सील

लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहणार 

Updated: Jun 23, 2020, 02:00 PM IST
कोरोना : लालबाग मार्केट परिसर पाच दिवसांसाठी सील  title=

मुंबई : कोरोनाचे रूग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लालबाग मार्केट परिसर पाच दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लालबाग मार्केट परिसर हा मुंबईतील अतिशय गजबजलेला परिसर आहे. 

या भागात गेल्या चार दिवसांत कोरोनाचे ७ रूग्ण मिळाल्याने महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याकरता हा परिसर सील करण्यात आला आहे. चार लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच अनलॉक करून काही नियम  शिथिल करण्यात आले होते. या काळातच परिसरात कोरोनाचे रूग्ण अधिक वाढू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच इथल्या रहिवाशांनवरही बाहेर पडण्यावर निर्बंध लादलण्यात आले आहेत.  पालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या वतीनं उद्यापासून या परिसरात हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. 

मुंबईचा राजा आणि लालबागमधील मानाचा गणपती असणाऱ्या गणेश गल्लीच्या मूर्तीची उंची यंदा कमी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा कृत्रिम तलावात विसर्जित होईल एवढ्याच उंचीची मूर्ती बनवण्यात येईल. ही मूर्ती शाडूची असेल. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्याकरता लाईव्ह दर्शनाची व्यवस्थाही मंडळाच्यावतीने करण्याचा मानस आहे.