Lockdown : मासेमारी करुन आलेल्या शेकडो बोटी बंदरात उभ्या

सातपाटी बंदरात पालघर जिल्हयातील शेकडो बोटी मासेमारी करुन आलेल्या आहेत.  

Updated: Mar 26, 2020, 08:06 PM IST
Lockdown : मासेमारी करुन आलेल्या शेकडो बोटी बंदरात उभ्या title=
संग्रहित छाया

मुंबई : सातपाटी बंदरात पालघर जिल्हयातील शेकडो बोटी मासेमारी करुन आलेल्या आहेत. त्यात मासळी असून त्यासाठी विक्रीचा परवानगी नसल्याने सर्व मासे तसेच पडून आहेत. अनेक बंदरात हीच परिस्थिती आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्याआधी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या अनेक बोटी आता किनाऱ्यावर परतल्या आहेत. या बोटींमध्ये असलेले मासे करायचे काय?, असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी ही माहिती दिली. त्यांनी राज्य शासनाला पत्रही लिहिले आहे.

मुंबई, पालघर तसेच कोकण किनारपट्टी भागातील अनेक मच्छिमारांवर कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मासेमारी करुन परतलेल्या शेकडो बोटी गेल्या चार दिवसांपासून तशाच उभ्या आहेत. या बोटींमध्ये लाखो रुपयांचे मासे आहेत. या माशांची विक्री करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी तांडेल यांनी केली आहे. 

राज्यात संचारबंदी लागू होण्याआधीच अनेक बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या होत्या. सात ते आठ दिवसांनंतर या बोटी आता माघारी परतल्या आहेत. पालघरमधील सातपाटी, वसई या बंदरांसह सर्वच बंदरांत सध्या शेकडो बोटी उभ्या आहेत.  बोटी आता गेल्या चार पाच दिवसांपासून बाजारासाठी धक्क्यावर जेटीवर बंदरात आल्या आहेत, परंतु कोणीही सप्लायर किंवा विक्रेते मासळी विकत घेऊ इच्छित नाहीत, अशी खंत तांडेल यांनी व्यक्त केली आहे.

साधारण प्रत्येक बोटीत एक ते चार लाखांपेक्षा जास्त प्रमाणात मासे बेवारस अवस्थेत पडून राहिल्याने मासे नाशिवंत होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. काही तरी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.आयुक्त मत्यव्यवसाय राजीव जाधव यांना त्वरीत संपर्क साधून निर्देश देण्यात यावेत की मछिमार सहकारी संस्थांना सदर मासळी विकण्यासाठी परवानगी देण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावेत ,अशी मागणी मछिमारांतर्फे करण्यात आली आहे.