प्रफुल्ल पवार, रायगड : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात उमटे धऱणातून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात धरणाच्या दुरुस्ती आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम एका ठेकेदाराला देण्यात आलं. मात्र त्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 62 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊ लागल्यानं काही मोजक्याच गावांना धऱणातून पाणी पुरवठा केला जातो. याचं कारण आहे धरणात साठलेला गाळ. या धऱणावर जलशुद्धीकरण प्रकल्पही नाहीये त्यामुळे नागरीकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय.
2014 मध्ये या धऱणाच्या दुरुस्ती आणि नुतणीकरणाचं काम केंद्र सरकारच्या भारतनिर्माण कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आलं. धरणाच्या सांडव्याचे मजबुतीकरण करणे. साठवण टाकी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्याचं काम करणे. त्याचबरोबर वीजजोडणी आणि गुरुत्ववाहिनीचंही काम घेण्यात आलं होतं. हे काम सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला 6 कोटी 51 लाख रुपयांना देण्यात आलं. ठेकेदार कंपनीला जवळपास 2 कोटी 89 लाख रुपयेही अदा करण्यात आलेत. मात्र त्यानंतर याठिकाणी एक रुपयाचंही काम झालेलं नाही आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी शिवसेनेनं केली आहे.
एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण आणि त्यात फोफावत चाललेला भ्रष्टाचार कधी थांबणार हाच खरा सवाल आहे.