मुंबई : धारावीत आज कोरोनाचे केवळ ५ रूग्ण वाढले तर दुसरीकडं दादरमध्ये मात्र ५८ रूग्ण वाढले. माहिममध्ये १३ रूग्ण वाढल्याचे समोर आलंय. धारावीत एकूण रूग्णसंख्या २५०७ तर दादरमध्ये एकूण रूग्णसंख्या १५०२ झालीय. मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता १.१७ टक्के असा झाला आहे.
२४ विभागांपैकी २१ विभागात हा सरासरी दर १.५ टक्क्यांच्या खाली तर १४ विभागात हा सरासरी दर १.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या १४ पैकी ११ विभागात १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५९ दिवसावर आल्याचे सांगण्यात आलंय.
Coronavirus कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामध्ये मागील चोवीस तासांत आणखी भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत देशात ३७,७२४ कोरोनाबाधित रुग्ण नव्यानं आढळले आहेत. परिणामी देशातील एकूण रुग्णसंख्या ११,९१,९१५ पर्यंत पोहोचली आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा १२ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सध्या देशभरात ४,११,१३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत ७,५३,०५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या विळख्यात अल्यामुळं आतापर्यंत २८,७३२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली.
२१ जुलैपर्यंत देशात १,४७,२४,५४६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळं आणि अनलॉकचे टप्पे सुरु झाल्यामुळं कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं होतं. परिणामी अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळल्यामुळं राज्यातील अनेक जिल्हे सध्या लॉकडाऊनमध्येच आहेत. तर, अनलॉक झालेल्या ठिकाणांवरही काही नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश शासन आणि आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.