चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : महिलांवरील वाढते अत्याचार काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसून, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime News) उल्हासनगर शहरातील एका नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांनी एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी तताडीनं शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार या पि.टी. शिक्षकानं सात वर्षीय मुलीला 'मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल...' असं बोलत धमकावलं. इतक्यावर न थांबता त्यानं या मुलीचं गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली. विद्येच्या मंदिरात घडलेल्या या किसळवाण्या प्रकाराविषयी आता अनेक वर्गांतून संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना समोर आली होती जिथं बदलापूर येथील एका शाळेमध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीनं दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं होतं. आंदोलनं आणि समाजातील प्रत्येक घटकानं कडाडून विरोध केल्यानंतर पोलीस प्रशासनानं आरोपीवर कारवाईचा बडगा उगारला होता. तिथं हे प्रकरण शांत होत नाही तो त्यासम अनेक घटना राज्यात घडल्या आणि कायद्याची भीती कोणालाच उरली नसल्याचं स्पष्ट झाल्यानं हा कायदाच अधिक कठोर केला जावा अशा मागणीनं जोर धरला.
काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ येथेही एका रिक्षा चालकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. जिथं 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकानं घरी सोडण्याच्या बहाण्यानं तिला रिक्षात बसवलं. मुलगी रिक्षात बसताच त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेत तिथं तिच्यावर अत्याचार केला. या धककादायक घटनेबाबत मुलीने पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपीवर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.