नवी मुंबईत 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा, एकाच छताखाली दर्शन घेण्याची अपूर्व संधी

Paduka Darshan Utsav 2024: नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार आहे. भाविकांना एकाच वेळी 18 गुरू पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.

Updated: Mar 26, 2024, 02:16 PM IST
नवी मुंबईत 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा, एकाच छताखाली दर्शन घेण्याची अपूर्व संधी title=

Paduka Darshan Utsav 2024: नवी मुंबईतल्या वाशी इथं राज्य आणि देशभरातील 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय.  वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये  'श्री फॅमिली गाईड्स' या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतो. आज दिनांक 26  मार्च आणि उद्या 27 मार्च असे दोन दिवस भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आलीय. भाविकांना दोन्ही दिवस रात्री 10 वाजेपर्यंत  पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.   

यावेळी पद्मभूषण श्री एम. यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच डॉ पुरुषोत्तम राजीमवाले अग्निहोत्र संपन्न करणार आहेत. याशिवाय शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा 'सूर-संध्या' हा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय..  तसंच पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्थाही असणार आहे.

या 18 श्रीगुरुंच्या पादूका
महाराष्ट्रातील18 श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी भाविकांसाठी उपलब्ध झाली आहे. एकाच छताखाली साधकांना आपल्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची अपूर्व संधी या निमित्ताने मिळणार आहे. यात 
संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर), श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य - श्री एम), श्री रामदास स्वामी (सज्जनगड), श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री टेंबे स्वामी महाराज (माणगाव), श्री गजानन महाराज (शेगांव), परमसद्‌गुरू गजानन महाराज (शिवपुरी), संत वेणाबाई (मिरज), श्री शंकर महाराज (धनकवडी), श्री गुळवणी महाराज (पुणे) आणि श्रीगुरू बालाजी तांबे (कार्ला) या श्रीगुरूंच्या पादुकांचा आशीर्वाद सोहळ्यात घेता येणार आहे.

आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी 'संकल्प ते सिद्धी सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. 'श्रीगुरू पादुका उत्सवा'च्या माध्यमातून आध्यात्मिक मार्गाची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.