मुंबई : एन्काऊंटर फेम दया नायक यांना बेहिशोबी संपत्ती प्रकरणात स्पेशल कोर्टानं क्लीन चीट दिलीय.
कोर्टाच्या म्हणण्यानुसार, नायक यांची प्रॉपर्टी एकूण कमाईच्या १० टक्के अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागानंही (एसीबी) आपल्या अहवालात दया नायक यांना क्लीन चीट दिलीय. यामुळे, दया नायक यांच्या बढतीचे दरवाजेही खुले झालेत.
मुंबईत ८० हून अधिक जणांचं एन्काऊन्टर करणाऱ्या दया नायक यांना बेहिशोबी संपत्तीच्या आरोपानंतर २००६ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर त्यांना अटकही झाली होती परंतु, ५९ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जमानतीवर त्यांना सोडण्यात आलं. या आरोपांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती.
पोलीस खात्यानंही नायक यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे आढळले नाहीत. २०१० मध्ये एसीबीनं हा अहवाल स्पेशल कोर्टासमोर सादर केले होते. स्पेशल एसीबी कोर्टानंही नायक यांना क्लीनचीट दिलीय.