राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरलंय?

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला. तरी राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरले आहे.

Updated: Sep 18, 2017, 05:19 PM IST
राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरलंय? title=

दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला. तरी राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरले आहे. त्यातूनच काँग्रेसने राणेंना न विचारताच सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून राणेंना धक्का दिला आहे. राणेंनी पक्ष सोडला आहे असं गृहित धरूनच काँग्रेसने ही पावलं उचलली आहेत. त्याआधी आपण काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याचे संकेत अनेकदा राणेंनीच दिले असल्यामुळे काँग्रेसला हे पाऊल उचलणे भाग पडले.

शिवसेना सोडून २००५ साली काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नारायण राणेंचा काँग्रेसमधील प्रवासही आता संपण्याच्या मार्गावर आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार अशी चर्चा होती. १२ एप्रिल २०१७ रोजी अचानक राणे मुख्यमंत्र्यांबरोबर अहमदाबादला गेले आणि त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राणे भाजपामध्ये जाणार या चर्चेवर शिक्कामोर्बत झाले. 

भाजपाप्रवेशाबाबत राणेंनी आतापर्यंत थेट वक्तव्य केलं नसलं तरी तसे संकेत त्यांनी अनेकदा दिलेत. काही दिवसांपूर्वी राणेंचे आमदार पुत्र नितेश राणेंनी आमचा एकच पक्ष, नारायण राणे अशा आशयाचे ट्विटही केलं होतं. राणेंच्या या सगळ्या हालचालींवर काँग्रेसचे बारीक लक्ष होते. त्यामुळे कुणी पक्ष सोडला तरी फरक पडत नाही अशा आशयाची वक्तव्य काँग्रेसचे नेते करू लागले. 

राणे पक्ष सोडणार असल्यानं काँग्रेसनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केलं. नांदेडला झालेल्या राहुल गांधी यांच्या जाहीर मेळाव्याचं निमंत्रण काँग्रेसने राणेंना दिले नाही. तर राणेंना न विचारताच काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून राणेंना दुसरा धक्का दिला. राणेंनी पक्ष सोडल्याचे गृहित धरूनच कोकणात पावलं टाकण्यास काँग्रेसनं सुरुवात केलीय. 

राणे काँग्रेस सोडून भाजपावासी होणार असतानाही त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यातूनच त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधणेही सुरू केलं. तर आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केलं. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर राणेंचा भाजपा प्रवेश होईल अशी आधी चर्चा होती. मात्र हा प्रवेश लांबला आहे, प्रवेश लांबतोय तशी राणेंची अस्वस्थताही वाढत जातेय. आता नवरात्री दरम्यान राणेंचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरू झालीय. मात्र त्याबाबतही अद्याप काही ठोस माहिती नाही. 

दुसरीकडे राणेंना काँग्रेस सोडली तर त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक मुंबईतील नायगाव येथील आमदार कालिदास कोळंबकर आणि त्यांचा आमदार पुत्र नितेश राणे हे दोन आमदार वगळता कुणीही आमदार जाणार नाही. तर २००५ साली शिवसेनेतून राणेंसोबत काँग्रेसमध्ये आलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते आता काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत, त्यामुळे शिवसेना जेवढी फोडली तेवढी काँग्रेस राणेंना फोडता येणार नाही. 

तसंच कोकण, त्यातही सिंधुदुर्ग जिल्हा वगळता भाजपाला राणेंचा इतर ठिकाणी फायदा होणार नाही. काँग्रेस आणि शिवसेनेविरोधात प्रचारासाठी मात्र भाजपा राणेंचा चांगला वापर करू शकेल. आता राणे भाजपामध्ये कधी प्रवेश करणार आणि भाजपा त्यांचे कशा प्रकारे पुनर्वसन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.