देवेंद्र फडणवीस म्हणतात 'कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव मिटवता येणार नाही'

'प्रकल्प कोणी केला आहे, श्रेय कोण घेतंय, या सरकारमध्ये थोडीशी जरी माणुसकी उरली असेल तर...'

Updated: Apr 5, 2022, 12:12 PM IST
देवेंद्र फडणवीस म्हणतात 'कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव मिटवता येणार नाही'  title=

मुंबई : महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) पहिला टप्पा येत्या एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी सुरु होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शेलू दरम्यानचा 220 किमीचा समृद्धी महामार्गाचा हा पहिला टप्पा आहे. तर नागपूर ते शिर्डीदरम्यान समृद्धी महामार्ग जूनमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने नेणारा प्रकल्प अशी याची ओळख आहे. 

दरम्यान या रस्त्याच्या उ्घाटनावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. 

समृद्धी महामार्ग सुरु झाला पाहिजे याचा मला आनंद आहे. पण त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत ती कामं पूर्ण केल्यानंतरच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल. घाई घाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता सुरु होईल पण त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

कोणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव त्याच्यावरुन मिटवता येणार नाही. जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आणि ही संकलपना वीस वर्ष माझ्या डोक्यात होती, की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे, त्यावेळी आम्ही तो करु शकलो.  त्यावेळी या रस्त्याचा जो मोठ्याप्रमाणावर विरोध करत होते, आता ती लोकं या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगवाला आहे. 

सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेकडो बैठका घेतल्या, प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केलं. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे.. कोणी कितीही श्रेय घेतले तरी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहित आहे की हा प्रकल्प कोणी केला आहे.. आता सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. या सरकारला थोडीशीही माणुसकी उरली असेल तर त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावं, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ही मंत्री म्हणून काम केले असले तरी या समृद्धी महामार्गाचा एकूण एक काम आणि व्हीजन देवेंद्र फडणवीसांचा होता. समृद्धी महामार्ग करावा हे पहिल्यांदा त्यांनाच कळलं. त्यामुळे ठाकरे सरकारला माझी विनंती आहे की समृद्धी महामार्गाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावं, असं मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारचं मन लहान आहे, मनस्थिती ही गेली आहे, मुंबईतील मेट्रो प्रकल्प रस्त्यांचे काम समृद्धी महामार्गाचे काम फडणवीस सरकारने केलं. मात्र, ठाकरे सरकार सूडबुद्धीने आणि कलुषित भावनेने वागत आहे.. आमचं सरकार असते तर आम्ही निश्चितपणे मागील मुख्यमंत्र्याला बोलावून त्यांना पुढाकार देऊन उद्घाटन केलं असतं.  मात्र या सरकारला फडणवीसांचा तिटकारा आलेला आहे.  फडणविसांनी विधान सभेत या सरकारचे भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे ते चिडले आहेत अशी टीकाही मुनगंटीवर यांनी केली.

या लोकांनी प्रत्येक गोष्टीचा विरोध केला आहे. नानार असो, कोस्टल रोड असो किंवा समृद्धी महामार्ग. सर्वांना विरोध केले आणि आता मात्र आपले नाव देऊन मोकळे होत आहेत. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं त्याला आमचा विरोध नाही. मात्र आता उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.