मुंबई : ज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session 2022) उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदारी तयारी केली आहे. विरोधकांचा मुख्य मुद्द असणार आहे तो नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नवाब मलिकांच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. दाऊद इब्राहिमचे सहकाऱ्यांसोबत थेट व्यवहार करुन मनी लॉन्ड्रींगच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं राहिलं.
कुणाला वाचवायला ज्यांनी दाऊद इब्राहिमला सहकार्य केलं, त्यांना वाचवायला अख्खं सरकार उभं राहिलं. देशात असं कधी घडलं नाही की पोलीस कस्टडीमध्ये गेल्यानंतरही मंत्रीपदावर व्यक्ती कायम आहे. एकप्रकारे राज्यघटनेचा अवमान हे सरकार करतंय असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी उभं आहे. आम्ही मागणी लावून धरणार आहोत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. त्यामुळे भाजप ठामपणे हा राजीनामा झाला पाहिजे, याकरिता सभागृहात संघर्ष करेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन हे सरकार असं दाखवू इच्छितो की एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे. संजय राठोडांचा राजीनामा पटकण होतो, पण नवाब मलिकांनी देशद्रोह्याबरोबर व्यवहार केल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यांना वाचवण्याचा प्रकार दुर्देवी आहे. जनाची नाही तर मनाची तरी पडताळून पाहिली पाहिजे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ज्या सरकारमध्ये दाऊद आणि मुंबईच्या मारेकऱ्यांशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीबरोबर सहानभूती आहे, त्या सरकारच्या चहापानाला जाण्याचा प्रश्नच नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.