मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) बाबरी प्रकरणावरुन केलेल्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीकेसीत झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांच्यावर 'देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती', अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. याच टीकेला फडणवीस यांनी गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या उत्तर भारतीय युवा मोर्च्याच्या सभेतून उत्तर दिलं. (devendra fadnvis criticize to chief minister uddhav thackeray on babari controversy)
"मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा", असा इशारा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
"उद्धव ठाकरे म्हणाले फडणवीसांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. माझं आजं 102 किलो वजन आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो इतकं होतं. उद्धव ठाकरेंना समजेल अशा भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता", अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
"सहलीला तुम्ही गेले होते,आम्ही नाही गेलो होतो. कोठारी बंधूंच्या कार सेवेवेळीही मी गेलो होतो, तेव्हा मी दाऊच्या जेलमध्ये गेलो होतो. काश्मीरमध्येही आंतकवादाविरोधासाठी मनोबल वाढवायला गेलो होतो", असंही फडणवीस यांनी यावेळेस स्पष्ट केलं.
"बाबरी पाडताना ते म्हणतायत शिवसैनिक नव्हते. फडणवीस म्हणतात मी गेलो होतो तिकडे, तेव्हा तुमचं वय काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेला होतात. चला चला चला अयोध्येला चला. असं काय होतं का?" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती.
"तुमचं वय काय, बोलता काय, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंय. देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती. मग लोकांना श्रमच करावे लागले नसते.", असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.