मुंबई : धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा मुंडे आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करूणा शर्मा मुंडे यांनी आज महापालिकेत येवून महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली आहे.
स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे. असं करूणा शर्मा मुंडे यांनी म्हटलं आहे.
'अतिरीक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉम सारख्या अॅप्लीकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. मी सुद्धा २५ वर्षे कधीच घराबाहेर पडले नाही. गेल्या २ महिन्यांपासून मी घराबाबेर पडून बोलायला सुरुवात केली आहे.' असं ही करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
'माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं बोलण्यास कोर्टानं मला मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्यागोष्टी पुराव्यासकट बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे जे काही झालं त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढणं पसंत केलं. मी इथुन पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचं' देखील करूणा शर्मा मुंडे यांनी म्हटलं आहे.