काँग्रेस आमदारांच्या 'लेटर बॉम्ब'मुळं महाविकासआघाडीची डोकेदुखी वाढणार

आमदारांनी थेट काँग्रेस अध्यक्षा (Congress President) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Mar 30, 2022, 06:03 PM IST
काँग्रेस आमदारांच्या 'लेटर बॉम्ब'मुळं महाविकासआघाडीची डोकेदुखी वाढणार title=

मुंबई : काँग्रेसच्या आमदारांमध्ये सध्या नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे थेट काँग्रेस अध्यक्षा (Congress President) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून त्यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवरची नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून किमान समान कार्यक्रम राबवण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे आमदार मंत्र्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. २५ आमदरांची नाराजी महाविकासआघाडीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या २५ आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. महाविकासआघाडीतले काँग्रेसचे आमदार स्वतः.च्याच मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. हे आमदार सोनियांची भेट घेणार असल्याचंही समजतंय आहे.

महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आधीच निधीवाटपात अन्याय होत असल्याची भावना सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे. ते कमी झालं म्हणून की काय, काँग्रेस आमदारांनी स्वतःच्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर आळवला आहे. एवढंच नव्हे तर थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून 25 आमदारांनी मंत्र्यांविरोधात तक्रारही केली आहे.

काय आहेत तक्रारी?

1. काँग्रेसचे मंत्री आमच्या समस्या, तक्रारी ऐकत नाहीत
2. आमदारांच्या समस्यांकडे मंत्री कानाडोळा करतात
3. मतदारसंघातल्या विकासकामांसाठी निधी मिळत नाही
4. मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळं आगामी निवडणुकीत फटका बसेल

त्यामुळं सत्ताधारी आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय. .मात्र नाना पटोलेंनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 

काँग्रेस पक्षातच धुसफूस वाढली असताना, नाना पटोलेंनी थेट महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरच असमाधान व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यांनी सरकारच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

गेली तीन वर्षं कोरोनामुळं किमान समान कार्यक्रम राबवणं शक्य झालं नाही. परंतु आता कोरोना संकटाची तीव्रता संपली आहे. त्यामुळं किमान समान कार्यक्रम पुन्हा राबवण्यात यावा.
दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक कल्याणासाठीच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली जावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

या लेटर बॉम्बमधून पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे. मात्र काँग्रेस आमदारांची ही नाराजी काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.