'शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, मुनगंटीवारांना टोला'

'शिवसेना-भाजपमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत. मात्र, काही लोक खोडा घालायचे काम करत आहेत.'

Updated: Jun 11, 2019, 03:55 PM IST
'शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, मुनगंटीवारांना टोला' title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जोरदार यश मिळविल्यानंतर भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला केंद्रात केवळ एक मंत्रीपद देऊन बोवळण केली. त्यानंतर शिवसेनेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला पुन्हा शह देण्यासाठी भाजपकडून वेगवेगळी विधाने करण्यात येत आहेत. यावर शिवसेनकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना-भाजपमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या आहेत. मात्र, या वाटाघाटाच्या चर्चेत जे सहभागी नव्हते ते आता खोडा घालायचे काम करत आहेत. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

कुणाचा होणार मुख्यमंत्री यावरुन शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी पडलीय.  भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शाहांनी फर्मान काढले. त्यानंतर शिवसेनेतली अस्वस्थता वाढली आहे.  शिवसेना १३५- १३५ जागा लढवतील उरलेल्या १८ जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील,. मित्रपक्षांनी भाजपाच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी, म्हणजे प्रत्यक्ष भाजपाच्या कमळावर १५३ आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर १३५ जागा लढवल्या जातील. म्हणजे जास्त आमदार भाजपाचे निवडून आणायचे आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच बनवण्याची रणनिती अमित शाहांनी आखली आहे, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीतला निर्णय झालेला आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधान करु नये, असे युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी 'झी २४ तास'ला माहिती दिली. वाटाघाटीला नसलेल्यांनी स्वार्थासाठी युतीत खोडा घालू नका, नाव न घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

शिवसेना-भाजपात प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे वरूण सरदेसाई यांनी सांगितले. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचे काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता मुनगंटीवार यांना लगावला आहे.