महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Updated: Sep 20, 2020, 06:23 PM IST
महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

मुंबई : मुंबईतील एका ५५ वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क ११ किलोचा ट्यूमर काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला पोटाचे आजार होत असल्याने तपासणी केली असता, पोटामध्ये गाठ असल्याचं आढळून आले. साधारणतः नऊ तास शस्त्रक्रिया केल्यानंतर मोठ्या शर्थीने डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून ही गाठ काढली आहे. चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.

या रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल माजीद या नेतृत्वाखाली यूरोलॉजिस्ट डॉ. संतोष पालकर आणि भुलतज्ज्ञ डॉ. शिल्पा देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

सुजाता सिन्हा (नाव बदलले आहे) या चेंबूरमध्ये राहणाऱ्या आहेत. काही महिन्यांपासून या महिलेच्या ओटीपोटीत तीव्र वेदना जाणवत होती. परंतु, लॉकडाऊनमुळे या महिलेनं डॉक्टरांकडे न जाता दुखण्याकडे दुर्लक्ष केले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने झेन रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी सिन्हा यांची अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय चाचणी अहवालात पोटात मोठी गाठ असल्याचे निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा ट्यूमर काढला आहे. 

याबाबत माहिती देताना झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तन्वीर अब्दुल माजीद म्हणाले की, “सप्टेंबरमध्ये या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिचे वजन ८० किलो होते. पोटात दुखत असल्याने या महिलेची अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन करण्यात आली होती. या चाचणी अहवालात या महिलेच्या पोटात ट्यूमर असल्याचे निदान झाले. मूत्रपिंड, लहान आतडे आणि यकृतापर्य़ंत हा ट्यूमर पसरला होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं होते. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीनुसार महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील हा ट्यूमर काढून टाकण्यात आला आहे.’’ 
डॉ. माजीद म्हणाले, “महिलेच्या पोटातील हा ट्यूमर अतिशय मोठा होता.

 साधारणतः ११ किलो वजनाचा हा ट्यूमर होता. ही शस्त्रक्रिया नऊ तास सुरू होती. आता या महिलेची प्रकृती उत्तम असून तिला घरी सोडण्यात आले आहे.’’

रूग्ण सुजाता सिन्हा म्हणाल्या की, ‘‘गेल्या काही महिन्यांपासून मला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. पण लॉकडाऊनमुळे मी दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे पोटातील ट्यूमर वाढत गेला. एखाद्या गरोदर महिलेप्रमाणे माझे पोट दिसत होती. वजनही वाढते होते. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे.’’