close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आता पारंपारिक पोषाख

 मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आता पारंपारिक पोषाख 

Updated: Oct 23, 2019, 09:44 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आता पारंपारिक पोषाख

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अर्थात कॉनव्होकेशन सेरीमनीमध्ये आता पारंपारिक पोषाख विद्यार्थ्यांना घालावा लागणार आहे. शौर्याचं प्रतिक म्हणून शिवकालीन अंगरखा, सुंदरता म्हणून पैठणी बॉर्डर आणि विद्वता म्हणून जगन्नाथ (नाना) शंकरशेट टोपी असा हा पोषाख असणार आहे. मुंबई विदयापीठात आता काळा कोट आणि काळी टोपी दिसणार नाही. दीक्षांत समारंभात आता भारतीय पारंपारिक वेशभूषा पाहायला मिळणार आहे. हा नवा भारतीय ड्रेस कोड ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती.

शौर्याचं प्रतिक म्हणून शिवकालीन अंगरखा, सुंदरता म्हणून पैठणी बॉर्डर आणि विद्वता म्हणून जगन्नाथ (नाना) शंकरशेट टोपी... असं उत्कृष्ट त्रिवेणी संगम असलेलं आणि भारतीय संस्कृती आणि परंपरेला साजेसा पोशाख हे यावर्षीपासून मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाने यावर्षीपासून दीक्षांत समारंभाच्या पोशाखात बदल केला आहे. विद्यापीठाने नेमलेल्या या क्षेत्रातील तज्ज्ञ समितीचा अहवाल आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला आहे.

मागील वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पोशाखात बदल करण्याची बाब विचाराधीन होती, त्या अनुषंगाने हा बदल करताना भारतीय परंपरा, संस्कृती, पोशाख, रंगसंगती, फॅब्रिक्स, मटेरिअल अशा विविध बाबींवर सखोल अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाने प्रा. एम.डी. तेली, प्रा. अरमैती शुक्ला आणि श्रीमती अर्चना राव यांच्या तीन सदस्यीय समितीचे गठण केले होते. समितीने वेळोवेळी घेतलेल्या बैठकीच्या अनुषंगाने व त्यांच्या अभ्यासाअंती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा पोशाख ठरविण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. 

विशेष बाब म्हणजे पोशाखासाठी खादीचा वापर करण्यात येणार असून खादी ग्रामोद्योग येथून फॅब्रिक्स मागविण्यात येणार आहे. तज्ज्ञ टेलर्सकडून प्रोटोकॉलनुसार विविध रंगांचे पोशाख शिवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी आणि पीएचडीप्राप्त विद्यार्थ्यांना विद्याशाखानिहाय विविध रंगाचे सॅच देण्यात येतात. सर्वसमावेशकतेबरोबर, संस्कृती, परंपरा यांचा उत्कृष्ट मिलाप विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पोशाखात दिसणार असल्याचेही कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

https://lh3.googleusercontent.com/-WSMmM4Qy9W0/XbB6zyvBhyI/AAAAAAAACqI/WnOBQ2eE3MMqLzTCLpwWMJHIGSUDWG_lQCK8BGAsYHg/s0/2019-10-23.jpg

विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेने ड्रेस कोड बदलण्याचा निर्णय याआधी घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या आधी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील ड्रेस कोड देखील मागील वर्षी बदलण्यात आला होता.