अमर काणे / गुवाहाटी : Maharashtra Political Crisis News Update : शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या बंडामागे भाजपचा हात आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या हॉटेलवर शिंदे गट तळ ठोकून आहे त्याठिकाणी जागता पाहारा आहे. आसामचे दोन मंत्री खास त्याठिकाणी हा जागता पाहारा देत आहेत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडीपासून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट शिंदे गटाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर ठेवली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन तात्काळ हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मुंबईचे आमदार अजय चौधरी यांनी नियुक्ती केली आहे.
गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये शिंदे गट आहे. त्यांच्यावर आसाम सरकारच्या दोन मंत्र्यांचा रेडिसन ब्लू हॉटेलवर जागता पहारा आहे. हॉटेलवर दिवसा आसामचे मंत्री अशोक सिंगल यांचा पहारा देत आहेत. तर रात्री आसामचे मंत्री पयुश हजारीका रेडिसन ब्लूवर राहत आहेत. आसाम सरकारचे दोन्ही मंत्री गुवाहाटीत शिवसेना बंडखोर आमदारांच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दोन्ही मंत्री आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या अतिशय विश्वासातले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या बंडामागे कोणाचा हात आहे, याची चर्चा आता अधिक जोर धरु लागली आहे.
रेडिसन ब्लु हॉटेलबाहेर आसाम शिवसेना प्रमुख राम नारारायण सिंह निदर्शन करण्यासाठी पोहोचले होते. त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले. काल साताऱ्याहून आलेला शिवसैनिक संजय भोसले यालाही रेडिसन हॉटेलसमोरुन पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते रेडिसन हॉटेल समोर निदर्शन करण्याकरिता येत असताना आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेच्या बंड केलेल्या आमदारांना गुवाहाटी येथे ठेवू नये, अशी मागणी निदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस या आसामच्या कार्यकर्त्यांनी केली.