एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचं पोलिसांनी सांगितलं कारण

पोलिसांनी चौकशी दरम्यान, स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली. 

Updated: Oct 7, 2017, 04:17 PM IST
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचं पोलिसांनी सांगितलं कारण title=

मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याविषयी प्रश्न कायम असताना, या प्रकरणात पोलिसांचा अहवाल आता आला आहे. दादर पोलिसांनी हा चौकशी अहवाल दिला आहे. यात ऑफिसच्या वेळेत अचानक सुरू झालेला पाऊस, हे कारण देण्यात आलं आहे.

चेंगराचेंगरीचं मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी, असं एकाच वेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या आणि प्रवासी संख्या प्लॅटफॉर्मवर अधिक प्रमाणात झाल्याने ही घटना घडली, असं दादर पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी चौकशी दरम्यान, स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली. 

'आम्ही हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेकडेही त्यादिवशी १०.०० वा पाऊस पडला होता, याची माहिती मागवली आहे. त्यामुळे पाऊस पडत होता हा आमचा दावा खरा ठरेल', असं दादर पोलिसांनी म्हटलं आहे.

 ज्या कॉन्स्टेबलने सर्वात आधी चेंगराचेंगरीची माहिती स्टेशन मास्तरांना दिली होती, त्यांचा जबाब घेण्यात आला. पोलिसांनी ३९ जखमींसह जवळपास ७० जणांची जबाब घेऊन हा निष्कर्ष काढला. यादरम्यान पोलिसांनी त्या दिवशी ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर अनिल गुप्ता, आरपीएफ कॉन्स्टेबल, तिकीट क्लार्क यांचेही जबाब नोंदवले.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीला ८ दिवस उलटले आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. परळ आणि एल्फिन्स्ट स्टेशन्सना जोडणाऱ्या फूटओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली होती.