मुंबई : एन्ककाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) याला अटक करण्यात आली आहे. एनआयएकडून (NIA) ही कारवाई करण्यात आली आहे. मनसुख हिरेनप्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) पुरावे नष्ट केल्याचा आरोप प्रदीप शर्मावर ठेवण्यात आला आहे. आता शर्माला एनआयएची २८ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आलीय. सकाळी सहाच्या सुमारास एनआयएनं प्रदीप शर्माच्या अंधेरीतल्या घरावर छापा टाकला. एनआयएनं त्याच्या घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.
मनसुख हिरेनचा मृत्यू झाला त्यावेळी प्रदीप शर्मा देखील कटात सामील होते का ? याचा तपास एनआयए करतेय. याआधी या प्रकरणात एकूण 7 जणांना अटक झालीय. यात वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुनील माने, रियाज काझी यांना अटक झालीय. तर दोन दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांच्या जवळचे समजले जाणारे संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे.
मनदीप हिरेन खून प्रकरणात प्रदीप शर्माला अटक करण्यात आली आहे. प्रदीप यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आणि एका कटात सामील असल्याचा आरोप आहे. तो 21 जूनपर्यंत एनआयएच्या ताब्यात असलेल्या संतोष शेलारचा जवळचा आहे. संतोष शेलार यांच्यावर मनसुख खून प्रकरणात गुंतल्याचा आरोप आहे.
मनसुख हिरेन मुंबईच्या लगतच्या ठाणे जिल्ह्यात वाहनांच्या सुटे भागांचा व्यवसाय करायचा आणि ठाण्यातील डॉ. आंबेडकर रोडवर असलेल्या विकास पाम्स नावाच्या सोसायटीत राहत होता. 25 फेब्रुवारीला अँटिल्याजवळ स्कार्पिओ एसयूव्ही कार स्फोटक आणि धमकी देणाऱ्या पत्रासह, मनसुखच्या मालकीच्या ठिकाणी सापडली तेव्हा मनसुख चव्हाट्यावर आला.
या घटनेनंतर मनसुखवर अनेकदा मुंबई पोलिसांनी अनेक तास चौकशी केली. हिरेनने दावा केला होता की, ही कार आपल्याच मालकीची आहे, परंतु घटनेच्या एका आठवड्यापूर्वीच ती चोरीला गेली. या प्रकरणात, 5 मार्चला ठाणे येथील कळवा खाडीत हिरेनचा मृतदेह सापडला. त्यानंतर हिरेनच्या पत्नीने असा दावा केला होता की तिच्या नवऱ्याने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वाझे यांना एसयूव्ही दिली होती आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच त्यांनी कार परत केली होती.