मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शिवसेना-भाजपात भरती सुरु आहे. एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पक्षप्रवेश करत असताना आज माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. अंगावरील खाकी उतरवून त्यांनी खादीचा पर्याय निवडला आहे. चकमकफेम प्रदीप शर्मा शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर प्रदीप शर्मांच्या मनगटावर शिवबंधन बांधलं.
जुलै महिन्यात त्यांनी आपला राजीनामा गृहविभागाकडे सोपावला असून तो स्वीकारण्यात आला. शर्मा यांचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आगामी विधानसभेच्या निवणूकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
एन्काऊंडर स्पेशालिस्ट म्हणजेच जवळपास १०० हुन अधिक एन्काऊंडर करणारा अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेचनिवृत्ती अर्ज दिल्यानंतर आता ते राजकारणात सेकंड इनिंग सुरु करणार आहेत. शिवसेनेकडून त्यांना नालासोपारातून आमदारकीसाठी उतरवण्याची तयारीही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रदीप शर्मा पुढे राजकारणात उतरतील अशी चर्चा गेली दोन वर्षांपासून रंगत होती. पहिल्यांदा त्यांच्या राहत्या परिसर म्हणजेच अंधेरी परिसरातून त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्यक्रम ही राबवले होते. एन्काऊंडर स्पेशलिस्ट म्ह्णून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी पोलीस विभागाकडे स्वेच्छानिवृत्ती अर्ज सुपूर्त केल्यानंतर सर्वाना धक्काच बसला होता. परंतु त्यानंतर प्रदीप शर्मा काय करणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.