मुंबई : वीज कंपन्यांनी स्लॅब बदलल्याने ग्राहकांना जादा वीज बिलं आली. यातून ग्राहकांना दिलासा मिळालाच पाहीजे यावर बैठकीत चर्चा झाल्याचे अनिल परब म्हणाले. आज यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात बिलं वाढली त्याची वस्तुस्थिती मांडली आणि ग्राहकांना दिलासा मिळालाच पाहिजे अशी मागणी केल्याचे अनिल परब बैठकीनंतर म्हणाले. बिलं कशी जास्त आली आहेत ते वीज कंपन्यांच्या अधिकार्यांना दाखवून दिलं. यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. कोण कोणत्या स्टाईलने आंदोलन करतं माहित नाही आम्ही सरकार जनतेच्या बाजूने आहोत असेही परब म्हणाले.
वीज कंपन्यांनी बदललेले स्लॅब पूर्ववत करावेत यासाठी वीज नियामक आयोगाशी चर्चा केली जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यूझीलंडला असल्याने ते उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत. म्हणून उद्या याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले.
यावेळी परब यांनी राम जन्मभूमी विषयावर देखील भाष्य केले. राम जन्मभूमी आमच्या आत्मियतेचा विषय आहे, त्यापासून आम्हाला कोण वेगळं करू शकत नाही. कोणाला निमंत्रण द्यायचे हा मंदिर समितीचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.